रविवार, १५ सप्टेंबर, २०१३

 
 
'संभाजीराव भिडे' हे व्यक्तिमत्वच विलक्षण प्रभावी ! खरंतर पोषाख, अंगकाठी यांवरून हा पूर्वी कोणी फिजिक्सचा प्राध्यापक वगैरे असावा यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. पुणे (?) विद्यापिठातून एम. एस्सी. फिजिक्सचं सुवर्णपदक पटकावणारा हा माणूस खरंतर एखादा नामांकित वैज्ञानिक व्हायला पाहिजे होता. पण 'संघाचिया संगे' बिघडलेला हा माणूस नंतर कुठच्या कुठे पोचला. अत्यंत तल्लख स्मरणशक्ती, स्तीमित करणारी बुद्धीमत्ता, एखाद्या दगडाच्या अंगावरही रोमांच उभे करायला लावणारे वक्तृत्व आणि बारा महिने- चोवीस तास - तीन्ही त्रिकाळ सतत भ्रमण करणारे पाय - हा माणूस ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्या प्रत्येकाचा तो गुरूच झाला- भिडे गुरुजी.


पुढे संभाजीराव संघाचे सांगली जिल्हाप्रमुख झाले. तिथे संघाच्या रोपट्याचा त्यांनी डेरेदार वृक्ष केला. प्रत्येक तालुक्याच्या गावागावात शाखा सुरू झाल्या.बघताबघता संभाजीराव सांगली जिल्ह्याचे गुरुजी झाले. आता सांगली जिल्हा हीच आपली आजन्म कर्मभूमी करायचे त्यांनी ठरवले. पण म्हणतात ना... दैव योजी दुसरे!
दुर्दैवानं त्याचवेळी ठाण्याचे संघाचे अध्वर्यू श्री. रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाले. त्यांच्या जागी तितकाच खंदा कार्यकर्ता संघाला हवा होता."संघटनमें शक्ती है!" ही संघाची घोषणा. तिथे व्यक्तीला किंमत नाही. संभाजीरावांना ठाण्याला कूच करण्याचा आदेश झाला. सांगली जिल्ह्यातलं काम अर्धवट टाकून जायला संभाजीराव तयार होईनात. 'आदेशाचं उल्लंघन' हा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला. तेंव्हा पूर्ण आयुष्य ज्या संघाला वाहिलं त्यालाच रामराम ठोकण्याची पाळी संभाजीरावांवर आली. 'संभाजीरावांनी संघ सोडला' ही बातमी फारच धक्कादायक होती. कित्येक संघकार्यकर्ते हळहळले.
संभाजीरावांना असलेला संघाचा आधार गेला की संघाचा आधारस्तंभ ढासळला? कोणास ठाऊक? पण प्रचंड हिंमत आणि धडाडी असलेल्या संभाजीरावांनी सांगली जिल्ह्यात स्वतःच 'श्री शिवप्रतिष्ठान' नावाची संघटना काढली.
रा.स्व. संघाबद्दल बहुजन हिंदू समाजात'ही बामणांची संघटना' असा सर्वसाधारण समज! त्यामुळे वैचारीक बैठक असूनही तीन टक्के समाजाची संघटना जनजागृती करायला पुरेशी नाही हे संभाजीरावांनीओळखलं होतं. बहुजन समाजात जागृती घडवायची असेल तर त्यांना आपली वाटेल अशी संघटना पाहिजे.त्यातूनच गडांच्या वार्षिक मोहिमा काढण्याची कल्पना त्यांना सुचली. शिवाय संघाच्या धर्तीवर दसर्‍याला 'दुर्गामाता दौड'!
साडेपाच फूट उंची, उन्हातान्हात रापलेल्या तांबूस काळसर वर्णं, पांढर्‍याधोप मिशा, धोतर आणि पांढरा सदरा अशा वर्णनाचा - सांगली गावभागात एका खोलीत पुस्तकांच्या ढिगार्‍यात रहाणारा - स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून जेवण करणारा ऐंशी-पंचाएंशी वर्षांचा एक अविवाहीत म्हातारा - तोच बनला शिवप्रतिष्ठानचा सर्वेसर्वा!
बघता बघता जतपासून शिराळ्यापर्यंत आणि विट्यापासून मिरजेपर्यंत गावागावातले तरूण शिवप्रतिष्ठानाच े कार्यकर्ते बनले. दरवर्षी च्या मोहिमेत गडकोट पायाखाली घालणार्‍यांची संख्या लाखात पोचली."पोरगं गुरुजींच्या संगतीनं रांगेला लागतंय. व्यसनं करत न्हाई. आई-बाला मानतंय.", गावागावात गुरुजींचा आदर दुणावत चालला. विशेषतः सांगली जिल्ह्यातल्या तालमी याच शिवप्रतिष्ठानच् या 'शाखा' झाल्या. संघटनेची ताकद इतकी वाढली की काँग्रेस, जनता पक्ष, भाजप - या पक्षांचे पुढारी संभाजीरावांची मनधरणी करू लागले. आजवर प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुर्गामाता दौडीत भाग घेतला आहे.
संभाजीरावांनी कुणाला जवळ केलं नाही. पण दूरही लोटलं नाही.
हळूहळू प्रतिष्ठान लगतच्या जिल्ह्यांतही मूळ धरू लागलं.
१९९२ साली शिवप्रतिष्ठानच् या एका मोहिमेवरील एक किस्सा. मांढरदेवीपर्यंत एस्टीनं जाऊन तिथून चंदन-वंदन, पांडवगड, लिंगाणा आणि रायगडावर सांगता अशी ती मोहीम. तीन दिवसांची.
तीन हजार तरूण लोकांचा एक प्रचंड प्रवाह रांगा धरून गडांवर चढाई करत होता. आणि सर्वात मागून आमच्यासारख्या टंगळमंगळ करणार्‍यांना हाकलत चाललेला तो विक्षिप्त म्हातारा. ते अविस्मरणीय दृष्य कोणीही आयुष्यात विसरणार नाही.
रायगड! संध्याकाळची वेळ. सूर्य अस्ताचलाशी लगट करत होता. कवठे महांकाळहून आलेल्या धनगर कार्यकर्त्यांनी गंभीर घुमणार्‍या ढोलांनी वातावरण भारून टाकलं. जनता पार्टीचे सांगलीचे खासदार(?) संभाजी पवार (जात्याच पैलवान) काहीतरी बोलले.पोरांना चांगलं वळण लावल्याबद्दल भिडे गुर्जींचे आभार मानले.
आणि मग संभाजीराव भिडे - तीन हजारांचातो समुदाय श्वास रोखून त्यांचं भाषण ऐकत होता. शेवटच्या रांगेपर्यंत (माईकशिवाय) शब्द-न-शब्द स्पष्ट ऐकू येईल असा खणखणीत आवाज! रोमरोम थरथरवणारं वक्तृत्व.
त्याचवेळी त्यांनी प्रतिज्ञा केली - शिवछत्रपतींच्या मूर्तीची दररोज पूजा!
आजतागायत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज स्वखर्चाने रायगडावर छत्रपतींची पूजा करत आहेत. आपला नंबर कधी लागतो याची आतुरतेने वाट बघत आहेत...

सौजन्य :- श्रीमंत दामोदर गुरुजी...