बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

भिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा!

(सदरचे चित्र नीट निरखून पहा! काही न कळल्यास लेख वाचा आणि पुन्हा निरखून पहा! उलगडा होईल)

तत्पूर्वी समर्थांनी सांगितलेली काह विरक्त लक्षणेही विदित करू, ती लेख वाचल्यावर पुन्हा एकवार वाचून पहा!
विरक्तें विवेकें असावें | विरक्तें अध्यात्म वाढवावें |
विरक्तें धारिष्ट धरावें | दमनविषईं ||
विरक्तें भक्ती वाढवावी | विरक्ते शांती दाखवावी |
विरक्तें येत्नें करावी | विरक्ती आपुली ||
विरक्तें सत्क्रिया प्रतिष्ठावी | विरक्तें निवृत्ति विस्तारावी |
विरक्तें नैराशता धरावी | सदृढ जीवेंसीं ||
विरक्तें अभ्यास करावा | विरक्तें साक्षेप धरावा |
विरक्तें वक्तृत्वें उभारावा | मोडला परमार्थ ||
बहुतांस करावे परोपकार | भलेपणाचा जीर्णोद्धार |
पुण्यमार्गाचा विस्तार | बळेंचि करावा ||
दृढ निश्चयो धरावा | संसार सुखाचा करावा |
विश्वजन उद्धरावा | संसर्गमात्रें ||
विरक्तें असावें धीर | विरक्तें असावें उदार |
विरक्तें असावें तत्पर | निरूपणविषईं ||
विरक्तें सावध असावें | विरक्तें शुद्ध मार्गें जावें |
विरक्तें झिजोन उरवावें | सत्कीर्तीसी ||
असो...
धर्मवीर संभाजी महाराज कराल मृत्यूला तब्बल एक महिना झुंजवत होते...हा महिना श्री शिवप्रतिष्ठान तर्फ़े धर्मवीर बलिदान मास म्हणून साजरा केला जातो. या मासात सर्व धारकरी काही ना काही नियम पाळतात, जसे एकभुक्त रहाणे, अनवाणी फ़िरणे, मिष्टान्न न खाणे इ.
स्वत: भिडे गुरुजी मात्र या मासात अन्नग्रहण पूर्णपणे वर्ज्य करतात! होय या वयात देखील! नव्वदीच्या उंबरठ्याला लवकरच सामोरे जाणारे गुरुजी म्हणजे तीव्र इच्छाशक्ती व धगधगीत राष्ट्रभक्ती याचा ज्वलंत नमुना आहेत!

तर या वर्षीच्या (इ.स.२०१३) धर्मवीर बलिदान मासाचे २६ दिवस उलटले होते. फ़ाल्गुन वद्य एकादशी...६ ऎप्रील २०१३...
सांगलीचा १०० फ़ुटी रस्ता...गुरुजी सायकलवरून जात होते.अचानक कुण्या वाहनचालकाचा गुरुजींना चुकून धक्का लागला...आणि गुरुजी जोरात कोसळले...डोक्यावर पडल्यामुळे डोक्याला चांगलीच खोक पडली आणि २६ दिवस पोटात अन्न नसल्याने अशक्तपणा आलेला असल्याने तत्काळ भोवळ आली आणि गुरुजी बेशुद्ध झाले.धारक-यांनी त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल केले...पाहाता पाहाता ही बातमी वा-यासारखी उभ्या महाराष्ट्राला कळली...आणि सांगलीच्या धारक-यांचे फ़ोन खणाणू लागले...सगळेचजण चिंतेत...नक्की काय झाले कुणालाच कळेना..
दुस-या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व वर्तमानपत्रात हे वृत्त छापले गेले आणि महाराष्ट्राची काळजी अजुनच वाढली...

इकडे इस्पितळात गुरुजी रात्रभर शुद्ध हरपलेल्या स्थितीतच होते...पहाटे ६ च्या सुमारास त्यांनी खाडकन् डोळे उघडले...हातात सलाईनच्या नळ्या दिसल्या...डॊक्टरांना बोलावण्यात आले...
गुरुजी: हा काय प्रकार आहे? या नळ्या का लावल्या आहेत? ताबडतोब काढून टाका...
डॊक्टर: गुरुजी, आपल्याला उपवासामुळे थकवा आलेला आहे...अजून किमान एक महिना आपल्याला सक्तीची विश्रांती देणार आहोत. (Strict bed-rest)...आपण मुखावाटे अन्न घेत नाही आहात, निदान नळीवाटे तरी पोषण घेणे अत्यावश्यक आहे...
गुरुजी: आपण या नळ्या स्वत: काढणार आहात की मी स्वत: उपटून काढू?

धारक-यांना गुरुजींचा स्वभाव माहिती असल्याने त्यांनी त्वरीत नळ्या काढायची विनंती डॊक्टरांना केली...झाले..नळ्या काढल्या गेल्या...

गुरुजी तिथुन जे ताडकन् उठले ते तडक बाहेर पडले..जातान म्हणाले, "बलिदान मास सुरु आहे...कित्येक कामे पडलेली आहेत...मुकपदयात्रांचे नियोजन सुरु आहे...इथे पडून रहायला वेळ कुणाला आहे!"

सर्वजण अवाक् होऊन ते दृश्य पहात राहिले! इथवर देखील सर्व ठीक आहे...परंतु अक्षरश्: हबकणे या अवस्थेचा अनुभव मात्र त्यानंतर पुण्यातील धारक-यांनी घेतला! कारण या घटनेनंतर आम्ही सर्वजण अतिशय चिंतेत असतानाच केवळ दोनच दिवसात गुरुजी स्वत: पुण्यात हजर झाले !!भक्तीशक्ती संगम व अन्य काही विषयांसंदर्भात बैठक घेण्यासाठी! बर ते आले तेही एकटेच! लाल डब्याच्या गाडीने! आम्ही सर्वजण हतबुद्ध झालो! काय निष्ठा असेल कार्याप्रती! काय भक्ती असेल शिवरायांप्रती!

बैठक सुरु असताना निरखून पाहिले असता, गुरुजींच्या टोपीवर लालसर मळलेला डाग दिसला..नीट पाहिल्यावर दिसले की त्यांच्या डोक्याला जिथे खोक पडली होती तिथे ५-६ टाके घातलेले असून ते अजुन ओलेच आहेत! डोळ्यात टचकन् पाणी आले...चित्त कालवले...त्याच क्षणी निर्धार केला! जीव गेला तरी चालेल! पण गुरुजी सांगतील त्याच मार्गानं जायचं,,,तिथून गुरुजी तसेच तडक मुंबईला गेले! रात्री मुक्काम करा म्हणाल्यावर म्हणाले, "अरे, तुम्ही लोक रात्री झोपता त्यामुळे मला रात्री शिवप्रतिष्ठानचे कार्य करता येत नाही...मग निदान तो वेळ प्रवासात तरी भरून काढतो! म्हणजे उद्याचा उभा दिवस मला मिळेल!" काय बोलावे तेच कळेना! या मुंबईच्या बैठकीतच काढलेले हे गुरुजींचे छायाचित्र आहे! नीट पहा! त्यांच्या कपाळावर टोपीखाली ती लसलसणारी ओली जखम आणि टाके स्पष्ट दिसताहेत! आणि चेह-यावरचा करारही!
इथुन गुरुजी सातारला गेले...दौरे सुरुच राहिले...नियतीच्या छाताडावर पाय ठेऊन काम करणारे शिवप्रभूंचे मावळे कसे असतील हे आम्हाला गुरुजींकडे बघून कळाले! हा गुरुजीरूपी शिवकल्याणप्रवाह आमच्या आयुष्यात आला, याचाच अर्थ आमचे अनेक जन्मांचे पुण्य या जन्मी फ़ळाला आले!

भिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा! आणि लढत जगणे शिकवा!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३